मोबाइल बिझनेसमधून LG ची एक्झिट


नवी दिल्ली – आपल्या मोबाइल बिझनेसमधून LG या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल बिझनेस बंद करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीने सोमवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात मोबाइल सेगमेंटमध्ये सतत होत असलेल्या तोट्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स कंपोनेंट्स, रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कनेक्टेड डिव्हाइस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्युशन अशा सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कंपनीचे फोन बाजारात सध्या उपलब्ध असलेला स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध होत राहतील. तसेच एका ठराविक कालावधीपर्यंत एलजीचे फोन वापरणाऱ्या ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेटही जारी केले जाईल,असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

एलजीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैपर्यंतचा कालावधी मोबाइल फोनचा बिझनेस पूर्णपणे बंद करण्यासाठी लागेल. काही फोन मॉडेल्सचा स्टॉक या तारखेनंतरही मार्केटमध्ये उपलब्ध राहू शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. LG चे विंग, वेल्वेट, Q सीरिज, W सीरिज आणि K सीरीजचे स्मार्टफोन आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व मॉडेल्सची विक्री थांबवण्यात येणार नाही व ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट ठराविक कालावधीपर्यंत मिळत राहतील असे एलजीकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे सध्यातरी एलजी फोन वापरणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एलजीचा मोबाइल फोन बिझनेस बंद करण्याचा निर्णय आश्चर्यकारक नाही. कंपनीच्या सीईओंनी यापूर्वी जानेवारीमध्ये मोबाइल बिझनेसमध्ये सतत तोटा होत असल्याने अन्य सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. कंपनी तेव्हापासून मोबाइल बिझनेस बंद करणार असल्याची चर्चा होती. एलजीला मोबाइल बिझनेसमध्ये गेल्या जवळपास सहा वर्षांपासून तोटा सहन करावा लागत होता.