ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे ८८ व्या वर्षी निधन


आज बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 च्या सुमारास राहत्या घरात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. शशिकला यांनी 70 च्या दशकात अनेक सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये शशिकला यांनी अभिनय केला आहे. त्यांनी चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसोबतच खलनायिकेच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचे संपूर्ण नाव शशिकला जवळकर असे होते. त्यांनी ओमप्रकाश सैगल यांच्याशी विवाह केला. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती.

उद्योगात शशिकला यांच्या वडिलांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे संपूर्ण कुटूंब काम शोधण्यासाठी मुंबईत आले. याचवेळी त्यांची भेट लोकप्रिय गायिका-नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या ‘झीनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली.

त्यांनी आरती, गूहराह, फूल और पत्थर यासारख्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका चांगल्याच गाजल्यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळू लागल्या. आरती आणि गुमरा चित्रपटातील भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. तर 2007 साली सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.