राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर मनसैनिकांना आवाहन


मुंबई – राज्यावर पुन्हा एकदा लॉकाडाऊनच्या शक्यतेचे ढग जमा होऊ लागले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकाडाऊनबाबत चाचपणी सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी विरोधकांना विश्वासात घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फोन केल्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर मनसैनिकांना एक आवाहन केले आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातल्यानंतर लॉकाडाऊन सदृश्य निर्बंध लागू करण्याचा विचार सरकारने सुरू केला होता. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध उद्योजकांसह विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. रविवारीही मुख्यमंत्र्यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकाडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मनसेने सहकार्य करावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकाडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून केलेल्या संवादात केले. आपण सर्वांनी सरकारी सूचनाचे पालन करावे. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असल्याचे ट्वीट मनसेने केले आहे.