महाराष्ट्रातील महामार्गांसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींकडून भरघोस निधी जाहीर


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला आहे. हा निधी महाराष्ट्रातील रस्ते मार्गांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यातील विविध महामार्गांच्या कामांसाठीघोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती गडकरींनी ट्विटद्वारे दिली आहे.

यानुसार, पुणे जिल्ह्यातील एनएच ५४८-डीडी (वडगाव – कात्रज – कोंढवा – मंतरवाडी चौक – लोणी काळभोर – थेऊर फाटा – लोणीकंद रोड) वर कात्रज जंक्शनवर सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १६९.१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोलापूर विजापूर रोड एनएच ५२ (सोलापूर शहर भाग) वर २ लेन ते ४ लेनच्या पुनर्वसन व अपग्रेडेशनसाठी अंदाजे एकूण लांबी ३.३९० किमी, २९.१२ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच, पूर्णा नदीवर दोन पदरी पुलांच्या कामासाठी व शेगाव- देवरी फाटा एनएच ५४८ सी च्या कामासाठी ९७.३६ कोटी निधी मंजूर झाला आहे.

त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील कल्याण-निर्मल रस्ता एनएच ६१च्या दोन लेनचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणासाठी ४७.६६ कोटी व गुहागर-चिपळूण-कराड रोड एनएच १६६ ई च्या मजबुतीकरणासाठी १६.८५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

डीबीएफओटी(टोल बेसीस) पीपीपीवरील सिन्नर ते नाशिक विभागातील एनएच ५० ते फोर लेनच्या विकासासाठी ३.१३ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अनेक मार्गांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.

नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी केंद्रीय रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासंदर्भात भरघोष घोषणा केल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रसह आसाम, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी तसेच, लडाखच्या केंद्रशासित प्रदेशासाठी निधी जाहीर करण्यात आला . महाराष्ट्रासाठी २७८० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.

राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, फेरबांधणी व पुनर्वसनासाठी निधी पुरवला जाणार आहे. विदर्भात नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्हे, मराठवाड्यात बीड, परभणी, जालना, कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याांतून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गांवर रस्तेविकासाची कामे केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गांची बांधणी म्हणजे ‘विकासाचा महामार्ग’ असे गडकरी यांनी म्हटले आहे.