कोरोनाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने नक्की काय केले? – नारायण राणे


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. दरम्यान आज पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा देखील झाली आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. ते यावेळी कोणता निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषदेद्वारे भाजपा नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. आता राज्याला लॉकडाऊन करणे पेलवणारे नसून हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत असल्याचे नारायण राणेंनी म्हटले आहे.

राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, कोरोनाच्या रूग्णांची संख्या अन्य राज्यांमध्ये कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढत आहे? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी या सरकारने नक्की काय केले? आता सगळीकडून उठाव होऊ लागल्याने घाबरले आहेत. यांना लॉकडाऊनची धमकी देण्याचा अधिकार आहे का? नागरिकांना शिस्त पाळा नाहीतर आम्ही लॉकडाऊन सुरू करू, असे सांगत आहेत. हे राज्य काय तुम्ही विकत घेतले आहे का? नागरिकांशी बोलताना मान, सन्मान देऊन मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला म्हणून लॉकडाऊन करणे हे राज्याला आता पेलवणारं नाही. आज बेकारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गावी गेले तरी हीच परिस्थिती आहे. सर्व उद्योग-धंदे कोलमडले आहेत, याची चिंता राज्य सरकारला आहे की नाही? हे सरकार फसवाफसवीचे धंदे करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


सरकार आता नरमले असून निर्बंधाच्या गोष्टी करत आहे, तसेच आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन म्हणत आहे. दिवसभर काम करून माणसे संध्याकाळी घरी जातात, मग खरेदीला जातील अन्य कुठे जातील, आता काय घरी बसायचे का? लोकांनी खायचे काय? राहायचे कसे? मुलांना शिकवायचे कसे? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व अन्य मंत्री काहीही बोलत नसल्याचे यावेळी राणेंनी बोलून दाखवले.

तसेच, जनतेने लॉकडाऊननंतर उदरनिर्वाहचं साधन संपल्यानंतर काय करावे? मुख्यमंत्री दोन वेळेच्या जेवणाचे पॅकेट घरी पाठवणार आहेत का? या राज्य सरकारचे नाक कोरोनामुळे कापले ते सोडून द्या, पण महाराष्ट्र आर्थिकबाबतीत मागे गेला आहे, अधोगतीकडे गेला आहे. याला कारण हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार असल्याचा आरोप देखील राणेंनी यावेळी केला.