पुणेकर डॉक्टरचा दावा ; माझे औषध कोरोनाला झटक्यात बरा करतो


पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला असून यापुढेही ही आकडेवीर वाढत आहे. पुण्यात कोरोनाचा उद्रेक पाहता मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लसीकरणावरही पुण्यात भर दिला जात आहे. पुण्यात ही परिस्थिती असताना पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे.

कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध डॉ. सारंग फडके यांनी तयार केले आहे. कोरोनावर या औषधामुळे 100 टक्के रामबाण उपाय होत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना डॉ. फडके हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. तसेच या औषधाबाबत त्यांनी आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

आपण हे औषध आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे. हे औषध 1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या कोरोनाबाधिताला देण्यात आले आहे. डॉ. फडके हे या औषधाला मान्यता मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. पण केंद्राने अद्याप त्यांची दखल घेतली नाही.

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचे फडके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असे डॉ. सारंग फडके यांचे म्हणणे आहे.

हा दावा जरी डॉक्टर सारंग फडके यांनी केला असला, तरी कोणत्याही औषधाला सहजासहजी परवानगी मिळत नाही. जगभरात कोरोनासारख्या थैमान घालणाऱ्या आजारावर जगभरात औषध शोधले जात आहेत. हा संसर्ग पसरल्यानंतर जवळपास वर्षभराने भारतात लस उपलब्ध झाल्यामुळे डॉ. सारंग फडके यांच्या औषधाची वैद्यकीय पडताळणी किंवा तत्सम चाचण्या कशा होणार, कोण करणार हा प्रश्न आहे.

(टीप : डॉक्टर सारंग फडके यांनी केलेल्या दाव्याशी संदर्भात वरील बातमी ही आहे. कोरोना प्रतिबंधक कोणतेही औषध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)