रत्नागिरी : कालपासून सोशल माडियात एक पोस्ट व्हायरल होत होती, कि गुहागरमधील एक तरुण आपले घर सोडून निधून गेला आहे. ही पोस्ट सोशल मीडियात एवढी व्हायरल झाली की अखेर तो मुलगा सापडला आहे. गुहागरमधील हा तरुण देवाच्या नामस्मरणाच्या आवडीपोटी थेट गुजरातपर्यंत जाऊन पोहोचला. त्याच्या काळजीत संपूर्ण कुटुंबीय असताना, तो घरी फोन करण्यासही तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमधील इस्कॉन मंदिरात सापडला गुहागरहून बेपत्ता झालेला अथर्व
31 मार्च रोजी अथर्व गोंधळेकर हा गुहागर मधील देवघर येथील घरातून न सांगताच बाहेर पडला होता. त्याचा त्यानंतर शोध घेतला असता दोन दिवस त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. पण गुजरातमधील द्वारका परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरात तो असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली. सध्या अथर्व हा 12 वीचे शिक्षण घेत असून अगदी लहानपणापासून त्याला अध्यात्माची आवड होती. निर्जन ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात राहून ईश्वराचे नामस्मरण करायला त्याला आवडत होते.
त्याने बुधवारी घरातून बाहेर पडतानाही सोबत जपमाळ आणि पोथी नेली होती, अशी माहिती त्याचे वडील जितेंद्र गोंधळेकर यांनी दिली. त्यानुसार त्याला शोध घेतला जात होता. पण सकाळी त्याचा फोन आल्यानं तो गुजरातच्या मंदिरात असल्याचे समजले.
इस्कॉन मंदिरात ज्यावेळी अथर्व होता मंदिर प्रशासनाने त्यावेळी त्याला पाहिले होते. प्रशासनाने अथर्वला घरी फोन करायला लावला. पण तो तयार नव्हता, अखेर त्याला बळजबरी करून घरी फोन करायला सांगितला, तेव्हा त्याने फोन केला आणि याबाबत माहिती दिली. अथर्व सापडल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून, त्याला आणण्यासाठी गुहागरहून त्याचे कुटुंबिय रवाना झाले आहेत.