भारत बायोटेकच्या नाकातून देण्याच्या करोना लसीच्या चाचण्यांना परवानगी

करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारच्या लसी येण्याची शक्यता वाढत चालली असतानाचा नाकातून देता येणारी करोना लस लवकरच उपलब्ध होईल असे समजते आहे. हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीला नाकावाटे देण्याच्या करोना लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीने अशी मंजुरी भारत बायोटेक ला दिली असून पहिल्या चाचण्यांचा अहवाल समिती तपासणार आहे आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यातील चाचण्यांची परवानगी दिली जाणार आहे असे समजते.

देशातील चार राज्यात या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यात महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगाना राज्यांचा समावेश आहे. १८ ते ६० वयोगटातील १७५ लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन गट केले जात आहेत. ७० -७० चे दोन आणि तिसरा गट ३५ लोकांचा असेल. पहिल्या गटाला एकच डोस दिला जाईल. दुसऱ्या गटाला डोस आणि प्लेसबोही दिला जाईल तर तिसऱ्या गटाला फक्त प्लेस्बो दिला जाणार आहे. त्यानंतर परीक्षण करून अहवाल तयार केला जाणार आहे.

या लसीचा फायदा लहान मुलांना अधिक प्रमाणात होईल असे सांगितले जात आहे. सध्या लहान मुलांसाठी करोना लस उपलब्ध नाही. मात्र तरीही नाकावाटे देण्याच्या लसीच्या चाचण्या १८ वर्षांखालील मुलांवर करण्याची परवानगी दिली गेलेली नाही.