
पॅरिस – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम असून जगभरातील काही देशांमधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. काही देश कोरोना संकटातून बाहेर पडत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आणत सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अन्य काही देशांमध्ये अद्यापही लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या अशीच काहीशी परिस्थिती फ्रान्समध्ये आहे. नुकतीच तिसऱ्या लॉकडाउनची फ्रान्समध्ये घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच ही घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केली असून यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
फ्रान्सने केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा
बुधवारी फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करताना शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील, अशी माहिती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिली आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता व्यक्त करत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी लाटेला परतवून लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी देशातील निर्बंध मागे घेण्याची तयारी इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केली होती. पण कोरोनामुळे एक लाख मृत्यू झाले असून आयसीयूंची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आणि योजनेपेक्षा कमी वेगाने सुरु असलेले लसीकरण यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना माघार घ्यावी लागली आहे.
आपण जर आताच हालचाल केली नाही तर परिस्थितीवरील नियंत्रण गमावून बसू, अशी भीती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली. महिन्याभरासाठी फ्रान्समध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला असून शनिवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाला महामारीचा फटका न बसू देण्याची ग्वाही देणाऱ्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शाळादेखील तीन आठवड्यांसाठी बंद असतील, असे स्पष्ट केले आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन हे वर्षाच्या सुरुवातीपासून तिसरा लॉकडाउन टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. पण कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे फ्रान्सला फटका बसला आहे.
