नॉन स्टॉप प्रवास करत भारतात दाखल झाली तीन नवीन राफेल विमाने


नवी दिल्ली – तीन नवीन राफेल फायटर जेट विमाने बुधवारी रात्री ११ च्या सुमारास फ्रान्समधून भारतात दाखल झाली आहे. रात्री ११ च्या आसपास या राफेल विमानांच्या तुकडीने गुजरातमधील जामनगर एअर बेसवर लॅण्डींग केले. फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर ही राफेल विमान कुठेही न थांबता थेट भारतात पोहचली. विशेष म्हणजेच युएईच्या मदतीने या उड्डाणादरम्यान या विमानांना एअर टू एअर री फ्यूलिंगच्या माध्यमातून हवेतच इंधन भरण्यात आले. या नव्याने दाखल झालेल्या राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद चार पटींनी वाढली आहे.

भारतामध्ये राफेल विमानांची ही चौथी तुकडी दाखल झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार युएई हवाई दलाच्या मदतीने या विमानांना हवेतच इंधन भरण्यात आले. या अशापद्धतीने इंधन भरणे हे ऐतिहासिक असून या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध किती मजबूत असल्याचे दिसून आल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलांसाठी ही घटना अभिमानास्पद असल्याचेही सांगण्यात आले आहे.

अंबाला येथील गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये या तिन्ही राफेल विमानांना समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. आता भारतीय हवाई दलाकडे असणाऱ्या राफेल विमानांची संख्या या तीन नवीन राफेल विमानांमुळे १४ पर्यंत गेली आहे. राफेल विमानांची पुढील तुकडी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार आहे. यापुढील तुकडीतील राफेल विमाने ही उत्तर बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर तैनात करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

राफेलचे पहिले स्क्वॉड्रन अंबाला एअरबेसवर नियुक्त करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाच्या सर्वात महत्वाच्या एअरबेसपैकी एक असल्याने अंबाला एअरबेसला विशेष महत्व आहे. या एअरबेसपासून अवघ्या २२० किमीवर भारत पाकिस्तानची सीमा आहे. राफेल विमानांचे दुसरे स्क्वॉड्रन पश्चिम बंगालमधील हासिमारा एअरबेसवर तैनात करण्यात आले होते. त्यामुळे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनच्या जवळच्या एअरबेसवर ही राफेल विमाने आधीपासून तैनात असून नव्याने दाखल होणारी विमाने याच स्क्वॉड्रनमध्ये सहभागी होतील.