दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


नवी दिल्ली – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. 3 मे रोजी रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. गेली पाच दशके रजनीकांत हे सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले.


12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला. शिवाजीराव गायकवाड असे रजनीकांत यांचे खरे नाव आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले. दक्षिणेकडील राज्यात रजनीकांत यांना थलैवा आणि देव मानले जाते.

वयाच्या 25 व्या वर्षी रजनीकांत यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘अपूर्वा रागनगाल’ हा होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत कमल हसन आणि श्रीविद्या हे देखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हसनसोबत खलनायकाची भूमिका केली. मुख्य भूमिकेत ‘भैरवी’ हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.

टॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यांनी बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ चित्रपटातून पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मने जिंकली. त्यांच्या स्टाईलने अनेकांना वेड लावले. त्यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडवण्याचा हटके अंदाज , गॉगल घालण्याची आणि हसण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केली गेली.