केंद्र सरकारने मागे घेतला बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय


नवी दिल्ली : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला असून यासंदर्भातील माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्विट करुन दिली आहे. रात्री उशीरा माहिती समोर आली होती की, छोट्या बचत योजनांवरील व्याज आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत कमी करण्यात आले आहे. पण हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. तो आदेश नजर चुकीने निघाल्याचे, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली होती. त्यामुळे व्यादर 4.0% वरून 3.5% वर येणार होता, पण आता तो 4 टक्केच राहणार आहे. सुकन्या समृद्धी खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याजदर 7.6% टक्केच राहणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्केच राहणार आहे. सध्या पीपीएफ योजनेवरील जो व्याजदर आहे, तो 7.1 टक्केच राहणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के कायम राहणार आहे. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दर कमी होणार नाही.

व्याजात सर्वाधिक 1.1 टक्के कपात एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 5 टक्के, तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.4 टक्क्यांनी कमी केले होते, तर पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.9 टक्के कमी करुन ते 5.8 टक्के करण्यात आले होते.