पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला सुरुवात


नवी दिल्ली : बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आज नंदीग्राममधील ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी या लक्षणीय लढतीसाठी मतदान होत आहे. ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. पश्चिम बंगालच्या 4 जिल्ह्यांतील 30 जागांवर आज मतदान होत आहे, तर आसाममधील 13 जिल्ह्यांमधील 29 जागांवर मतदान होत आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झाला. ममता बॅनर्जी स्वत: कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झाले. दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची भवितव्य ठरणार आहे.

मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीने 211 जागा जिंकल्या होत्या. यावेळी टीएमसी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करीत आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की यावेळी बंगालच्या लोकांनी परिवर्तन करण्याचा विचार केला आहे. 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा भाजप दावा करीत आहे. तर काँग्रेस-डावी आघाडी आणि आयएसएफची महायुतीदेखील सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. बंगालमधील एकूण 294 जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत.