वाझेंच्या ड्रायव्हरने पार्क केली होती अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ – एनआयए


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाल्यामुळे एनआयएकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. सध्या या घटनेचा तपास एनआयएकडून सुरू असून, सचिन वाझे यांची चौकशी देखील सुरू आहे. दरम्यान, एनआयएने अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल मोठा खुलासा केला आहे. वाझे यांनी नव्हे, तर त्यांच्या खासगी ड्रायव्हरने स्फोटके असलेली कार पार्क केल्याचे एनआयए तपासातून समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सध्या एनआयकडून अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. एनआयएने या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे तत्कालिन प्रमुख सचिन वाझे यांच्यासह काही जणांना अटक केलेली आहे. संशयित आरोपींची चौकशी सुरू असून, दररोज नवनवी माहिती समोर येत आहेत.

अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ २५ फेब्रवारी रोजी पार्क करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांचा खासगी चालकाने पार्क केली होती. तर सचिन वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवत असल्याची माहिती आता एनआयए तपासातून समोर आली आहे. पांढरी स्कॉर्पिओ पार्क करेपर्यंत इनोव्हा तिच्या मागे होती. १७ मार्च रोजी मनसुख हिरेन यांनी मुलूंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्याच दिवशी मनसुख हिरेन हे शहर पोलीस मुख्यालयात आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये सचिन वाझे यांच्याकडे कारची चावी दिली, असे एनआयएचे म्हणणे आहे.

त्यानंतर स्कॉर्पिओ उभी करण्यात आलेल्या मुलूंड-ऐरोली रस्त्यावर सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी ड्रायव्हर गेला. वाझेंच्या ड्रायव्हरने कार सोसायटीत आणली. त्यानंतर २४ फेब्रवारीपर्यंत कार तिथेच उभी होती. २५ फेब्रवारी रोजी ड्रायव्हर ती कार घेऊन दक्षिण मुंबईत गेला आणि अंबानींच्या घराजवळ कार पार्क केली. ज्यावेळी स्कॉर्पिओ घेऊन ड्रायव्हर अँटिलियाच्या दिशेने येत होता, पोलिसांनी गाडी अडवू नये म्हणून वाझे स्कॉर्पिओच्या मागेच होते. रात्री दहा वाजता ड्रायव्हरने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली कार पार्क केली. त्यानंतर उतरून तो वाझे चालवत असलेल्या इनोव्हा गाडीत जाऊन बसला, अशी माहिती सूत्रांनी दिली.