भाजपच्या प्रचार व्हिडीओत झाला घोळ; चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सचा व्हिडीओ


चेन्नई – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू विधानसभा निवडणूक प्रचारात द्रमुक आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागत असतानाच दुसरीकडे एक मोठा घोळ झाला असून निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडू भाजपने तयार केलेल्या व्हिडीओमध्येच एक चूक झाल्याचे समोर आले. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याचीच क्लिप प्रचाराच्या व्हिडीओत काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपने समाविष्ट केली आहे. भाजपच्या जाहीरनामा सांगणारा हा व्हिडीओ असून, या चुकीची तामिळनाडूत चर्चा रंगली आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभांसाठी निवडणुका होत असून, सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. प्रचाराच्या मैदानातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. असेच काहीसे चित्र तामिळनाडूमध्येही असून, द्रमुक आणि काँग्रेसला भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. भाजपने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडीओ स्वरूपातही तयार करण्यात आला आहे.


तामिळनाडू भाजपने हा व्हिडीओ तयार करत असताना त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून व कार्ती चिदंबरम यांची पत्नी स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लिपही घेतली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्या नृत्यांगनाही आहेत. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडीओतील काही भाग भाजपने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओत समाविष्ट केला आहे.

काँग्रेसने भाजपच्या या चुकीवर तामिळनाडून बोट ठेवले असून, विनापरवानगी क्लिप वापरल्यावरून सुनावलही आहे. तामिळनाडू भाजपला उद्देशून टीकाही केली आहे. तुमच्यासाठी सहमती घेणे एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. पण, तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी कार्ती चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केले आहे की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली असल्याची टीका तामिळनाडू काँग्रेसने केली आहे.

दुसरीकडे तामिळनाडू भाजप आता या चुकीवरून नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या नृत्याची क्लिप समाविष्ट केल्यामुळे नेटकऱ्यांकडून भाजपला ट्रोल केले जात आहे. यावर स्त्रीनिधी चिदंबरम यांनीही प्रतिक्रिया दिली असून, हे सगळे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.