नवऱ्याने वर्षभरापासून शारिरीक संबंध न ठेवल्यामुळे महिलेची पोलिसात तक्रार


अहमदाबाद – आपल्याच पतीविरोधात गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या महिलेने अदालज पोलीस स्थानकामध्ये आपल्या दुबईत असणाऱ्या एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षाच्या मुलीला आपल्या नवऱ्याने बिअर पाजल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. त्याचप्रबरोबर नवऱ्याने मागील वर्षभरापासून एकदाही माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवलेले नसल्याचेही या तक्रारीमध्ये महिलेने म्हटले आहे.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये तिचे लग्न झाले आहे. या दोघांना लग्नानंतर काही वर्षांनी मुलगी झाली. या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे या महिलेला नवरा बळजबरीने बिअर पाजायचा. त्यानंतर तो बिअरचे कॅन दोन वर्षाच्या मुलीला खेळायला द्यायचा, असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. २०१७ साली आपण पतीसोबत दुबईला गेल्याचेही या महिलेनेही तक्रारीत म्हटले आहे. दुबईला गेल्यानंतर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार नवऱ्याने मला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

माझा नवरा दारु प्यायल्यानंतर माझ्याशी वाद घालायचा. माझ्या पालकांकडून हुंडा आणण्यासाठी, तो मला मारहाण करायचा. माझ्यावर तो अनेकदा बिअर पिण्यासाठी दबाव आणायचा. बिअर मला आवडत नाही, तरीही तो माझ्यावर बळजबरी करायचा. एवढेच नाही, तर त्याने माझ्या दोन वर्षाच्या मुलीलाही बिअर पाजली होती, असे या महिलेने तक्रारीत सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मुलीला खेळणी आणून देण्याऐवजी माझा नवरा तिला बिअरचे रिकामे कॅन खेळायला द्यायचा, असाही आरोप या महिलेने केला आहे.

माझ्या नाजूक तब्बेतीवरुन तो मला कायम टोमणे मारायचा. माझ्या तब्बेतीचे कारण देतच त्याने मागील वर्षभरापासून माझ्यासोबत शरीरसंबंधही ठेवले नसल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. नवऱ्याने मुलगी आजारी असताना औषधांसाठीही कधी पैसे दिले नसल्याचेही या महिलेने म्हटले आहे. औषधांसाठी मी पैसे मागितल्यावर तो मला तुझ्या पालकांकाडून पैसे घेऊन, ये असे सांगायचा, असा दावा या महिलेने केला आहे.

ही महिला याच वर्षी मार्च महिन्यामध्ये पतीसोबत भारतामध्ये परत आली. भारतात आल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला माहेरी सोडले आणि तो त्याच्या घरच्यांसोबत पुन्हा दुबईला निघून गेला. दुबईला जाण्यासंदर्भात त्याने आपल्याला अंधारात ठेवल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. २५ मार्च रोजी तो आम्हाला सोडून गेला त्यानंतर त्याच्याशी आमचा संपर्कच झाला नसल्याचेही या महिलेने म्हटले आहे. या महिलेने तिचा नवरा दुबईमधून युनायटेड किंग्डमला निघून जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल करुन घेतला असून या महिलेचा नवरा आणि त्याच्या नातेवाईकांचा ते शोध घेत आहेत.