वैज्ञानिकांचे म्हणणे,  कधीच संपणार नाही करोना

करोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून त्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन काळजीपूर्वक काम करत असलेल्या वैज्ञानिकांनी करोना जगातून कधीच जाणार नाही असे निरीक्षण नोंदविले आहे. हा विषाणू जिवंत प्राण्याच्या संपर्कात आला कि नेहमीच तो त्याची उपस्थिती दर्शवेल. त्यामुळे या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच त्याला रोखण्याचा खात्रीचा उपाय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जितकी रोगप्रतिकार शक्ती जास्त तितका हा विषाणू कमजोर होईल, पण या विषाणूचे अस्तित्व संपणार नाही असे सांगितले जात आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे वैज्ञानिक डॉ. समीरण पांडा या संदर्भात बोलताना म्हणाले, कोविड १९ पूर्वी सुद्धा करोना विषाणू होताच आणि तो कायम राहणार आहे. त्याच्या सोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. वुहान मध्ये करोनाची पहिली केस आली तेव्हापासून डॉ. पांडा प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

डॉ. पांडा म्हणाले, ९० वर्षापूर्वी इन्फ्युइंझा विषाणू आले, आजही ते आहेत. फक्त त्यांच्या स्वरुपात बदल झाला आहे. या विषाणूंचा प्रतिकार कसा करायचा आणि त्याच्यापासून कसा बचाव करायचा, त्यावरचे उपचार आपल्याला माहिती झाल्याने या विषाणूंचा परिणाम कमी झाला आहे. तरी इन्फ्ल्यूएन्झाचा विषाणू नष्ट झालेला नाही. दहा वर्षापूर्वी स्वाईन फ्ल्यू मुळे लोकांचे आयुष्य धोक्यात आले होते. त्यावरचा इलाज सापडल्याने आज स्वाईन फ्ल्यूची भीती कमी झाली आहे. स्वाईन फ्ल्यूचा विषाणू सुद्धा बदलला आहे.

तसाच करोना विषाणू सुद्धा रूप बदलतो आहे पण त्याला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे त्यांना कमी धोका आहे. हा विषाणू ज्यापद्धतीने रूप बदलतो आहे त्यामुळे अनेक वर्षे वैज्ञानिकांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र लसीकरण सध्याचा महत्वाचा उपाय आहे. मास्कचा वापर आणि सोशल डीस्टन्सिंग हा आता रोजच्या जीवनाचा भाग बनविणे आवश्यक आहे.