कथा पॅरिसमधील भयावह ‘कॅटाकोम्ब्स’ची

tower
आपले जग हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. तसेच या जगामध्ये अनेक ठिकाणेही आहेत, जी गूढ आहेत. अश्या गूढ रहस्यांच्या बद्दल मनामध्ये कुतुहल असणे, त्यांची उकल करण्याची उत्सुकता असणे, हा मनुष्याचा स्वभाव आहे. म्हणूनच अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पॅरिस शहरामध्ये जमिनीच्या खाली असणारी ही भुयारे अशाच ठिकाणांपैकी एक आहेत. ‘कॅटाकोम्ब्स’ या नावाने ओळखले जाणारे हे भुयारांचे जाळे येथे येणाऱ्या पर्यटकांना काहीसे अस्वस्थ करणारे आहे. ही भुयारे अठराव्या शतकामध्ये बनविली गेली असून, ही निर्माण का करण्यात आली, याची कथा मोठी रोचक आहे.
tower1
पॅरिस येथील ‘कॅटाकोम्ब्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुयारांमध्ये साठ लाख मानवी हाडांचे सापळे आहेत. जमिनीखाली पसरलेले हे भुयारांचे जाळे कैक किलोमीटर विस्तारलेले असून, या भुयारांच्या भिंती मानवी हाडांनी बनलेल्या आहेत. ही सर्व भुयारे पर्यटकांसाठी खुली नसून, यातील काही भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. अठराव्या शतकामध्ये पॅरिसमध्ये मृत व्यक्तींची शवे दफन करण्यासाठी जागा उरली नसल्यामुळे अनेक शवांना स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काही भूमिगत खाणींमध्ये दफन केले गेले. १७८० सालापासून १८१४ सालापर्यंतच्या काळामध्ये याच भूमिगत खाणींमध्ये सुमारे साठ लाख शवे दफन केली गेली. त्यानंतर ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सल्ल्यानुसार या शवांच्या हाडांचे सापळे भुयारांमध्ये नेण्यात येऊन त्यापासून भुयारांच्या भिंती बनविण्यात आल्या.
tower2
१८६७ साली कॅटाकोम्स्भ आम जनतेला पाहण्याकरिता खुली करण्यात आली. १९८० साली पोलिसांच्या काही सरावानिमित्ताने या खाणी उघडल्यानंतर या ठिकाणी एक चित्रपटगृह सापडले. तसेच या भुयारांमध्ये दूरध्वनी आणि विजेचा पुरवठा करणारी यंत्रणाही सापडली. ही यंत्रणा येथे कोणी आणि कधी उपलब्ध करविली हा प्रश्न, आणि त्याचबरोबर सापडलेला ‘आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नये’ असा संदेश, हे मोठे गूढ बनून राहिले. आताही ही कॅटाकोम्ब्स अनेक गुप्त संघटना आणि गुन्हेगारांच्या भेटीगाठींचे स्थळ असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment