नागपुरने ४ हजारांवर कोरोनाबाधितांसह गाठला नवा उच्चांक


नागपूर: कोरोनाने नागपुरात थैमान घातले असून कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला असला तरी कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आजवरच्या सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनही हादरले आहे.

कोरोना साथीने नागपुरात शिरकाव केल्यानंतर आजवरचा उच्चांक आज नोंदवला गेला आहे. आज एका दिवसात जिल्ह्यात तब्बल ४ हजार ९५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी आज १ हजार ९४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५ जणांनी आपला जीव गमावला आहे. नागपूर शहरातील स्थिती अधिक गंभीर आहे. नागपूर शहरातही दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला असून आज २ हजार ९६६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले टाकत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. ३१ मार्चपर्यंत नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे. त्याअनुषंगाने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचवेळी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन झटून काम करत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. असे असताना कोरोनाचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने भीती वाढू लागली आहे.

दरम्यान, नागपुरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने होळी, धूलिवंदन आणि शब-ए-बारात हे सण-उत्सव खासगी वा सार्वजनिक स्वरूपात एकत्र येऊन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात मिरवणूक काढण्यासही मनाई राहणार आहे. २९ मार्च रोजी (धूलिवंदन) बाजारपेठ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील तसेच भाजीपाला, मटण, चिकन शॉपसाठी दुपारी १ वाजेपर्यंतच परवानगी असेल, असे पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.