उद्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी होणार मतदान


नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ८ टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या २७ मार्चला होत असून उद्या एकूण ५ जिल्ह्यांमधील ३० मतदारसंघांसाठी मतदान होईल. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुरुलिया, बांकुरा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. या मतदार संघात एकूण २२,६४,७३४ मतदार आहेत. त्यापैकी ११,५७,६१८ पुरुष आणि ११,१६,१०३ महिला मतदार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मागील १० वर्षांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि यावेळी ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये एकाच वेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि भाजपप्रणित या दोन आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

ममता बॅनर्जींना निवडणुकीपूर्वी अनेक झटके बसले. ममता बॅनर्जींना अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे काही जुने साथीदारही भाजपमध्ये गेले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये राजकीय हिंसाचार उफाळला आहे. राज्यातील कुच बिहारमध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला. हे सर्व हल्ले तृणमूल काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप भाजपने केला. या हिंसाचारावरून भाजपने ममता बॅनर्जींना लक्ष्य केले आहे.

राजकीय हिंसाचाराचा पश्चिम बंगालला मोठा इतिहास असल्यामुळे यामुळे राज्यात शांततेत आणि निःपक्षपाती निवडणुका घेणे हे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर असते. म्हणूनच निवडणूक शांततेत होण्यासाठी राज्यात ८ टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. प्रत्येक टप्प्यातील मतदानावर केंद्रीय निवडणूक निरीक्षक प्रत्येक टप्प्यातील मतदानावर बारकाईने लक्ष ठेवून असतील.

उद्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. यातील बहुतेक मतदारसंघ आदिवासी भागात मोडले जातात. पुरुलिया, बांकुरा, झारग्राम, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर या जिल्ह्यांत मतदान होणार आहे. या हे जिल्हे डाव्यांचे वचर्स्व असलेला भाग मानला जात होता.