इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन एकदिवसीय मालिकेबाहेर


पुणे – कसोटी आणि टी२० मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यातही ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने बाहेर झाला आहे.

मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. चार टाके त्यावर मारण्यात आले आहेत. जोस बटलरकडे मॉर्गनच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली. याशिवाय फलंदाज सॅम बिलिंग्स देखील दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहे. बिलिंग्स पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना जायबंदी झाला होता. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे. लियाम लिव्हिंगस्टोनला इंग्लंडकडून एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

तर, भारताकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादवच्या एकदिवसीय पदार्पणाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. शिवाय, सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली, तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. सलामीवीर शिखर धवनला गवसलेला सूर हे पहिल्या सामन्याचे फलित म्हणता येईल. टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यामुळे धवनला उर्वरित दोन सामन्यांत वगळण्यात आले होते. परंतु एकदिवसीय मालिकेत मात्र ९८ धावांच्या खेळीसह दिमाखदार सलामी त्याने दिली आहे.

‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव पहिल्या सामन्यात महागडा ठरला. नऊ षटकांत त्याने ६८ धावा दिल्यामुळे कुलदीपच्या जागी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलचा संघात समावेश होऊ शकेल. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान त्रिकुटाने १० पैकी ९ बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्यामुळे टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराज यांना संधीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.