मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या


अमरावती – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दिपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

अतिशय डॅशिंग अधिकारी म्हणून दीपाली यांची ओळख होती. अनेक अधिकारी त्यांनी आत्महत्या केली हे अजूनही मानायला तयार नाहीत. वनविभागात त्यांची हत्या झाल्याचा सूर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. माणसे जिथे कामे करायला घाबरतात, त्याठिकामी ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवत होती. सर्वत्र त्यांच्या कामाची चर्चा होती. त्यांनी रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यांची त्यातून ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.

कमालीचे डेअरिंग आणि स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचितांनी वर्तवला आहे. हरिसाल वन परिक्षेत्राची त्यांनी धुरा सांभाळली. तसेच त्यांनी हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालूर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी भरीव कामगिरी केली होती. पुरुषांना लाजवेल अशी काहीशी त्यांची कामगिरी होती. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्या कर्तबगारीला नजर लागल्याचे वनखात्यात बोलले जात आहे. वेळोवेळी त्यांची मुस्कटदाबी केली जात होती. त्या गर्भवती असताना मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. या सर्व गोष्टी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिल्या आहेत.

त्यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड (CDR डाटा) हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन तपासले गेले पाहिजे. तेव्हा कुठे दिपालीचा बळी घेणारे हाती लागतील, अशी मागणीदेखील होत आहे. दरम्यान दीपालीने पत्रात ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर आज अटक करण्यात आली आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.