…म्हणून मी आरएसएसचा यापुढे संघ ‘परिवार’ असा उल्लेख करणार नाही – राहुल गांधी


नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी संघावर महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान देण्याच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. तसेच आपण या पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नसल्याचा टोलाही राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नसल्याची टीका राहुल गांधींनी ट्विटरवरुन केली आहे. माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असा उल्लेख करणे योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. यामध्ये व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नसल्यामुळे यापुढे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नसल्याचे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधींनी हे ट्विट उत्तर प्रदेशमध्ये ख्रिश्चन महिला पाद्र्यांवर धर्मप्रसार करत असल्याचा आरोप करत ट्रेनमधून उतरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे. राहुल गांधींनी या घटनेचाही विरोध केला असून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेले हे कृत्य म्हणजे संघाचा प्रपोगांडा राबवण्याचा प्रयत्न असल्याचा टोला राहुल यांनी लगावला आहे.