एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश


नवी दिल्ली – लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपणार असून, त्या पार्श्वभूमीवर नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरन्यायाधीश पदासाठी केंद्र सरकारकडून नवीन नाव मागविण्यात आल्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली आहे.

पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी यासंदर्भात पत्र पाठवले होते.

सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी केली जाते. सध्या शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती असल्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.

आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात ६४ वर्षीय रमण यांचा जन्म झाला. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते. १० फेब्रुवारी १९८३ पासून त्यांनी आपल्याला वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचे शिक्षण बी.एस्सी, बी.एल.पर्यंत झालेले असून, त्यांनी संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये स्पेशलायझेशन केले आहे.