देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्तक्षेप करणार नाही!


मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बॅकफुटवर जावे लागले असतानाच आता शिवसेनेने देखील या प्रकरणात सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेना अनिल देशमुख प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, अशी माहिती मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा होणार की नाही याबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. पण सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्तक्षेप करणार नाहीत. देशमुखांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत असताना दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे सांगितले होते. गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केला होता. पण त्याबाबत पैसा कसा गोळा केला जातो, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, देशमुखांची बाजूही आम्ही जाणून घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली होती.