मध्य प्रदेशात भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी


ग्वाल्हेर – आज सकाळी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये मंगळवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या वृत्ताला अतिरिक्त पोलीस निरीक्षकांनी दुजोरा दिला आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चार लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

समोरासमोर बस आणि रिक्षाची धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहितीसमोर येत आहे. हिंदुस्तान टाइम्सला पोलीस निरिक्षक असणाऱ्या रवी भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. या महिला एका कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली. मरण पावलेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत असल्याचे भदोरिया यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. बस आणि रिक्षाची ग्वाल्हेरमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. ईश्वराकडे मी प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो, असे ट्विट चौहान यांनी केले आहे.

या दु:खद प्रसंगी मी आणि मध्य प्रदेशमधील जनता मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून ५० हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी माहितीही चौहान यांनी दिली.