लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्याला डिवचायचे नाही ; अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा


मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर लावून धरली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी कमालीचे आक्रमक झाले आहेत. फडणवीसांना उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांची खाती त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचे उत्तर द्यावे, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन आता भाई जगताप यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.


भाई जगताप यांनी केलेली टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत असून, प्रत्युत्तर देताना अमृता यांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही! अशा आशयाचे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माझा सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली, याचे उत्तर द्यावे. तब्बल 21 जणांना फडणवीस यांनी त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय बोलणार? असे भाई जगताप म्हणाले होते. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.