पुणेकरांनों वेळेत सावध व्हा…अन्यथा आणखी कडक निर्बंध लादावे लागतील


पुणे – वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शिवाजीनगरमधील जम्बो कोविड सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमधील ५५ बेड सध्या सुरु करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पण सर्व नियमांचे पुणेकरांनी पालन करावे, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. कोरोना नियमावलीचे पालन पुणेकरांनी केले नाही, तर भविष्यात आणखी कडक निर्बंध लादले जाऊ शकतात, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

आजपासून शिवाजीनगर येथील सीईओपो महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर यापुढील काळात कशाप्रकारे सेंटरचे नियोजन असणार आहे, याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

पुणे शहरात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत होते. आपण तेव्हा जम्बो कोविड सेंटर उभारले होते. पण तीन महिन्यांपूर्वी रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे हे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. पण आता पुन्हा रुग्ण संख्या अधिक प्रमाणात आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजपासून कोविड सेंटर सुरू करीत असून आठवड्याभरात ५०० बेड सेवेसाठी असणार असल्याचे यावेळी महापौरांनी बोलताना सांगितले.

या सेंटरमधील ५०० पैकी २५० ऑक्सिजन बेड, २०० सीसी बेड आणि ५० आयसीयू बेड असणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. या सेंटरची क्षमता ८०० बेड्सची असल्याचे हे सेंटर सुरु करण्यात आले, तेव्हा सांगण्यात आलेले. या सेंटरमधील ५५ बेड आजपासून सुरु करण्यात आले असून आठवडाभरात ही संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.