मराठमोळ्या पल्लवी जोशी यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालक पल्लवी जोशी यांना जाहीर झाला आहे. दिल्लीमध्ये आज जाहीर झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पल्लवी जोशी यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पल्लवी यांना हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवरआधारित ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी जाहीर झाला आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, श्वेता बसू, अंकुर राठी आणि प्रकाश बेलवडी अशी तगडी स्टारकास्ट असतानाही पल्लवी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपट समिक्षकांनी पल्लवी यांच्या अभिनयाचे कौतुक केल्याचे पहायला मिळाले. आज राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने पल्लवी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

आज दिल्लीमध्ये २०१९ सालांमधील कलाकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा कऱण्यात आली. मागील वर्षी मे महिन्यामध्ये या पुरस्कारांची घोषणा होणे अपेक्षित होते, पण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलली होती. आज अखेर दिल्लीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून कंगना राणावतला तर सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धनुषला विभागून देण्यात आला. तर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला असून ‘द ताश्कंद फाइल्स’मधील आएशा अली शाह यांच्या भूमिकेसाठी पल्लवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन पल्लवी यांचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.