महाभारतातील पात्रांना समर्पित आहेत ही मंदिरे

temple
भारतामध्ये कौरवांना आणि पांडवांना, व महाभारतातील इतर पात्रांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. याच मंदिरांमध्ये एक मंदिर पांडव पत्नी द्रौपदीला समर्पित आहे. हे मंदिर कर्नाटकातील बेंगळूरू येथे असून सुमारे आठशे वषांपूर्वी या मंदिराचे निर्माण करविण्यात आले होते. याच मंदिराला धर्मराय स्वामी मंदिर या नावानेही ओळखले जाते. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जवळ सारनौल या ठिकाणी सूर्यपुत्र कर्णाचे मन्दिर आहे. याला दानवीर कर्ण मंदिर या नावाने ओळखले जाते. हे मंदिर संपूर्णपणे लाकडाने बनविले गेले असून, याच मंदिरामध्ये पांडवांची देखील पाच लहान मंदिरे बनविली गेली आहेत.
temple1
केरळ राज्यामध्ये कोलम जिल्ह्यातील मायमकोत्तू मलांचारुवू नामक ठिकाणी गांधारीचा भाऊ आणि कौरवांचा मामा शकुनीचे मंदिर आहे. या मंदिराला ‘पावितत्रेश्वरम’ या नावाने ओळखले जाते. शकुनीला समर्पित असलेल्या या मंदिराच्या जवळच दुर्योधनाचे मंदिर आहे. प्रयागराज (अलाहाबाद) येथे शरशय्येवर निजलेल्या भीष्माचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये शरशय्येवर पहुडलेली भीष्माची प्रतिमा बारा फुट लांबीची आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली येथे भीमाची पत्नी हिडींबा हिचे मंदिर आहे. या हिडींबा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून भाविक आपले रक्त अर्पण करीत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment