इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाची वंशज असलेली अॅलिस जन्मतःच बहिरी होती. त्यामुळे इतरांच्या ओठांच्या हालचालींवरून ते काय बोलत असावेत हे ताडण्याचे कौशल्य प्रिन्सेस अॅलिसने लहान वयातच आत्मसात केले. या कौशल्याच्या माध्यमातून अॅलिस इतरांशी सहज संवाद साधू शकत असे. अॅलिस इंग्रजी आणि जर्मन भाषा अस्खलित बोलत असे. सबंध युरोपमध्ये अॅलिसचा एक अतिशय सौंदर्यवती राजकन्या म्हणून लौकिक होता. वयाच्या सतराव्या वर्षी ग्रीसचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू यांच्याशी ओळख झाल्यानंतर अॅलिस व अँड्र्यूच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि १९०३ साली हे जोडपे विवाहबद्ध झाले. विवाहाच्या नंतर अॅलिस तिच्या पतीसमवेत ग्रीसमधील अथेन्स येथे राहू लागली.
प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्सेस अॅलिस यांना चार मुली झाल्या आणि चार मुलींच्या नंतर त्यांचा पुत्र प्रिन्स फिलीप यांचा जन्म झाला. हेच प्रिन्स फिलीप इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचे पती आहेत. अॅलिसचे पती प्रिन्स अँड्र्यू यांचा जास्त वेळ परिवाराच्या विना, शिकार, मित्रमंडळींच्या सोबत मेजवान्या यामध्येच जास्त खर्च होत असे. त्यामुळे अॅलिस आणि त्यांच्या मुलांसाठी अँड्र्यू फार वेळ देऊ शकत नसत. त्यामुळे अॅलिसने देखील मुलांचे संगोपन करताना धार्मिक कार्यांमध्ये आपले मन रमविले होते. आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी लागणारे मानसिक बळ अॅलिसला ईश्वराची आराधना करून मिळत असल्याचे ती म्हणत असे.
ईश्वराची आराधना करताना आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली असल्याचे, आपल्याला अनेक चमत्कारी अनुभव आले असल्याचे अॅलिस म्हणत असे. पण तिच्या या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसला नाहीच, उलट अॅलिसची मानसिक स्थिती बिघडली असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले. १९३० साली अॅलिसला मानसिक ताण असह्य झाल्याने तिचा ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’ झाला. नाईलाजास्तव तिची रवानगी एका स्विस मनोरुग्णालयात करण्यात आली. तिला मनोरुग्णालयामध्ये धाडण्याचा निर्णय इतका अचानक घेण्यात आला, की तिला तिच्या मुलांची भेट घेण्याचा अवधी देखील मिळाला नाही. त्याकाळी अवघे नऊ वर्षांचे असलेले प्रिन्स फिलीप शाळेतून घरी परतले तेव्हा त्यांच्या आईला रुग्णालयामध्ये पाठविले गेल्याचे त्यांना समजले.
अॅलिस मनोरुग्णालयामध्ये तीन वर्षे राहिली. मधल्या काळामध्ये तिच्या सर्व मुलींचे विवाह पार पडले, पण त्यातील एकाही समारंभाला अॅलिस उपस्थित नव्हती. १९३२ साली अॅलीसची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर अथेन्स येथे परतून अॅलिस एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहू लागली.
१९४१ साली नाझी फौजांनी अथेन्स ताब्यात घेतल्यानंतर हजारो लोकांची रवानगी कॉन्सेनट्रेशन कॅम्प्स् मध्ये होऊ लागली. त्यांच्या अनाथ मुलांना अॅलिसने आपल्या छत्रछायेखाली घेत, त्यांच्यासाठी अन्नछत्रे चालविली, आजाऱ्यांची सुश्रुषा केली. एका ज्यू परिवारातील पुरुषांची रवानगी कॅम्पमध्ये झाल्यानंतर तब्बल एक वर्षभर अॅलिसने त्या कुटुंबातील स्त्रिया व मुलांना आपल्या घरामध्ये आश्रय देत नाझींपासून सुरक्षित ठेवले होते. या दरम्यान अनेकदा नाझी अधिकारी तिच्या घरी चौकशीसाठी येत असत. पण आपण बहिरे असल्याचे दाखवीत अॅलिस त्यांच्या प्रश्नांची उत्तरे टाळीत असे.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अॅलिसने नन होण्याचा निर्णय घेतला. त्यांनतरही गरिबांची सेवा करण्याचे तिचे कार्य अविरत चालूच राहिले. १९६७ साली अॅलिसने अथेन्स सोडले आणि आपले पुत्र फिलीप आणि स्नुषा राणी एलिझाबेथ यांच्याबरोबर राहण्यासाठी ती लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेस येथे आली. १९६९ साली प्रिन्सेस अॅलिसचा मृत्यू झाला. जेरुसलेम येथे आपले अवशेष पुरले जावेत अशी तिची इच्छा होती, मात्र तिला इंग्लंडमधील शाही दफनभूमीमध्ये दफन करण्यात आले. मात्र १९८८ साली अॅलिसच्या शेवटच्या इच्छेला मान देत तिचे अवशेष जेरुसलेम येथे हलविण्यात आले.