सीसीटीव्हीत कैद झाली सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांची १७ फेब्रुवारीची भेट


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात असून त्यांनी अजून दोन लक्झरी वाहने जप्त केली आहेत. यामधील एक कार (Pardo) रत्नागिरीमधील शिवसेना नेते विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरी कार मर्सिडीज बेन्झ आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज तीन दिवसांपूर्वी पोलिसांकडून जप्त करण्यात आली. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा सध्या ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे आहे. ठाणे सत्र न्यायालयात शुक्रवारी एटीएसकडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते.

यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटे १७ फेब्रुवारीला चर्चा झाल्याचं समोर आले आहे. ओला कॅबने हिरेन दक्षिण मुंबईत गेले होते. त्यांनी आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा केला होता.

सचिन वाझे आपले कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. यानंतर त्यांचे वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभे असल्याचे दिसले आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असून वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

मनसुख हिरेन काही मिनिटांनी रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचे दिसत आहे. गाडी जवळपास १० मिनिटे तिथे पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

सीएसएमटीला ज्या ओला कॅबने मनसुख हिरेन यांनी प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, हिरेन यांना प्रवासादरम्यान पाच वेळा फोन आला. हा फोन वाझे यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आले होते. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आल्याची माहिती आहे.