ऑक्सफर्ड एस्ट्रोजेनेका लसीचा वापर फ्रांस जर्मनी कडून पुन्हा सुरु

जर्मनी, फ्रांस आणि स्पेन या देशांनी ऑक्सफर्डच्या एस्ट्रोजेनेका कोविड १९ लसीचा काही काळासाठी थांबविलेला वापर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या देशात करोना लसीकरण पुन्हा सुरु झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एस्ट्रोजेनेका कोविड १९ लसीमुळे रक्तात गुठळ्या होत असल्याचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर जर्मनी, फ्रांस आणि स्पेन या देशांनी या लसीचा वापर थांबविल्याची घोषणा केली होती. मात्र युरोपीय संघ औषध नियामक संस्था ईएमए ने ही लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. वरील देशांनी ईएमए कडून या लसीला मंजुरी मिळाली तर परत या लसीचा वापर करण्याबाबत विचार केला जाईल असे म्हटले होते.

ईएमएने एस्ट्रोजेनेका कोविड १९ लसीमुळे रक्तात गाठी होण्याचा धोका नसल्याचे आणि या लसीचा वापर केल्याने निर्माण होणाऱ्या धोक्यापेक्षा त्याचे फायदे अधिक असल्याचे म्हटले आहे. लाखो लोकांना ही लस दिली आहे आणि त्यातील अगदीच थोड्या लोकांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे आढळले आहे आणि त्यासाठी ही लस कारणीभूत असल्याचे पुरावे मिळाले नसल्याचेही म्हटले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लसीच्या वापराला पूर्वीच मान्यता दिली आहे.