कोरोनाची तिसरी लाट आल्याने फ्रान्समध्ये एक महिन्याचा लॉकडाउन जाहीर


पॅरिस – भारतासोबतच जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्याकडे अनेक देशांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे. फ्रान्समध्येही कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी मर्यादित लॉकडाउनची घोषणा केली आहे. गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधानांनी पॅरिससहीत देशातील १६ ठिकाणी एका महिन्यांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.

यासंदर्भात सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हा लॉकडाउन शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवड्यांसाठी लागू होणार आहे. नवीन लॉकडाउनमध्ये मार्च आणि नोव्हेंबरमधील आधीच्या लॉकडाउनसारखे कठोर निर्बंध नसतील. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण या लॉकडाउनमुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा अर्थचक्रव्यवस्थेला चालना देण्याच्या हिशोबाने पुन्हा सर्व काही सुरु करण्याच्या योजना पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. या लॉकडाउनमुळे मॅक्रॉन यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकांना या लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडता येणार आहे. पण मित्रांच्या घरी जाऊन पार्टी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क न घालण्यासाठी हा लॉकडाउन लागू करण्यात आलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी नियम न पाळणाऱ्यांचे कान टोचले आहेत. नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच परवानगी पत्र असेल तरच लोकांना घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायम करण्याची परवानगी दिली जाईल. कोणालाही आपल्या घरापासून १० किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.

फ्रान्समधील शाळा आणि विद्यापीठे या लॉकडाउनदरम्यान सुरु राहणार आहेत. तसेच सर्व अत्यावश्यक सेवा तसेच पुस्तके आणि संगीताशी संबंधित दुकाने सुरु टेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी बोलताना कॅस्टेक्स यांनी एका प्रकारे ही तिसरी लाट असून तिने देशात प्रवेश केला असल्याचे म्हटले होते. त्यांनी पुढे बोलताना या तिसऱ्या लाटेनेही देशावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला असून संसर्ग झालेल्यांची संख्या वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कॅस्टेक्स यांनी संसदेला संबोधित करताना, महामारी ओव्हरटाइमचा खेळ करत आहे. आम्ही याला कोरोनाची तिसरी लाट म्हणून पाहत असल्याचे म्हटले होते. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकेडवारीनुसार फ्रान्समध्ये आतापर्यंत ४२ लाखांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ९१ हजार ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून देशातील अर्थचक्राला गती मिळवून देण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी टप्प्या टप्प्यात सेवा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतले होते. पण आता पॅरिससोबत १६ ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याचा पुन्हा एकदा फ्रान्सला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज आहे. तिसऱ्यांदा लॉकडाउन करण्यात आल्याने आता अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाला धोका पोहचू शकतो, असे मॅक्रॉन यांच्या निटकवर्तीयांचा अंदाज असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या लॉकडाउनमुळे ओढावणाऱ्या आर्थिक संकटामधून सावरण्यासाठी मॅक्रॉन प्रशासनाला जास्त जोर लावावा लागणार आहे.