मंगळवारी मटण आणि चिकनची दुकाने बंद ठेवण्याची सूचना; भडकले ओवैसी


हरियाणा: मंगळवारी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय हरियाणातील गुरुग्रामच्या महानगर पालिकेच्या सामान्य बैठकीत घेण्यात आला आहे. मटण आणि चिकनची दुकाने बंद ठेवण्याची सूचना वॉर्ड क्रमांक 23 चे नगरसेवक अश्वनी शर्मा यांनी दिली होती. त्यानंतर देशभरात या निर्णयाविरोधात टीका केली जात आहे. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत या निर्णयाचा निषेध केला आहे.


ओवैसी याबद्दल म्हणाले की, इतर लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात, यावरुन एखाद्याच्या भावना कशा दुखावू शकतात? लोक आपल्या इच्छेने मटण वा चिकन खरेदी करतात, विकतात व आणि खातात. यासाठी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. असे असेल तर दारुची दुकाने शुक्रवारी का बंद केली जात नाहीत? भारतातील लाखो मटण हे लोकांचे अन्न असल्यामुळे याकडे काहीतरी अशुद्ध आहे, असा दृष्टिकोन योग्य नाही. ओवैसी यांनी गुरुग्राममध्ये मंगळवारी मटणाची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयासंबंधित बातमीचे कात्रण रिट्वीट करीत आपले मत व्यक्त केले.

त्याचबरोबर पालिकेच्या बैठकीनुसार अनधिकृत मटण विक्रेत्यांवर लावली जाणारे चलानची किंमत 500 रुपयांनी वाढवून 5000 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 3 वेळा चलान कापल्यानंतर संबंधित मटणाचे दुकान सील केले जाईल. जर सील केलेले दुकान कोणी उघडले तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.