कर्नाटकातील मशिदींवरील लाऊडस्पिकरवर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंदी


बंगळुरु : एकीकडे अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुंनी पहाटे मशिदीवरील लाऊड स्पिकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोप मोड होते, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे प्रकरण ताजे असतानाचा दूसरीकडे देशातील दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पिकरवर बंदीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

याबाबतचे परिपत्रक कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने प्रसिद्ध केले असून हे आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवसा लाऊडस्पिकर लावताना तो आवाज ध्वनी प्रदुषणाच्या मानांकनानुसार असावा, असा आदेश देखील वक्फ बोर्डाने दिला आहे.

जनरेटर सेट, लाऊड स्पिकर तसेच लोकांशी सार्वजनिक संभाषण करण्यासाठी अनेक मशिदी तसेच दर्ग्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत असल्याचे आढळून आले आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य तसंच मानसिक परिस्थिती यावर या आवाजामुळे परिणाम होतो. आवाजासाठी ठरवण्यात आलेल्या निकषांचे पालन करण्यासाठी 2000 सालामध्ये एक कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पिकर वापरण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदुषण ‘शांतता क्षेत्रात’ केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत. शांतता क्षेत्र असे शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आणि कोर्टापासून 100 मीटर आत असलेल्या परिसराला म्हटले जाते. फक्त अजान आणि आवश्यक गोष्टींसाठी मशिदीमधील लाऊड स्पिकरचा वापर करावा. इतर कोणत्याही सामान्य गोष्टींसाठी तो करू नये, असे निर्देश देखील या पत्रकामध्ये देण्यात आलेले आहेत.

कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा आदेश देताच त्याला तात्काळ विरोध देखील सुरू झाला आहे. या निर्णयाचा SDPI पक्षाचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष अब्दुल हनन यांनी विरोध केला आहे. कुराण, नमाज आणि अजान याबाबत वक्फ बोर्डाचा काहीही संबंध नाही. वक्फची जी संपत्ती सरकार, राजकारणी आणि खासगी व्यक्तींनी बळकावली आहे, ती ताब्यात घेण्यावर बोर्डाने काम करावे, अशी टीका हनन यांनी केली आहे.