सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारवर अमृता फडणवीस यांचा गंभीर आरोप


मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात अटक केली. विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच आता विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.


ट्विट करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधत गंभीर आरोपही केला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये, “एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर सारख्या शहरांत उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळत नाही, तर दुसरीकडे कोविड सेंटरमध्ये महाराष्ट्र सराकर भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसूली करण्याची योजना आपल्या काही हस्तकांसोबत मिळून आखत असल्याचे म्हटले आहे.