प्रभु रामचंद्रांशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ


गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला असून सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जाते आहेत. राज्यांतील विविध प्रचार मोहिमांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून आसाम दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून, त्यांनी गुवाहाटी आणि होजाई येथे रॅलीला संबोधित केले. प्रभु रामचंद्रांशिवाय आपला देश अपूर्ण असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी गुवाहाटी येथील रॅलीच्या आधी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जय श्रीराम अशा घोषणा कामाख्या मंदिरात ऐकून आनंद झाला, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल. प्रभु रामचंद्रांशिवाय भारत अपूर्ण आहे. प्रभु रामचंद्रांशिवाय शिवाय देशातील कामकाज सुरू राहू शकत नसल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

रॅलीत जनतेला संबोधित करताना योगी आदित्यानाथ यांनी काँग्रेसवर टीका केली. केवळ तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस करत आला आहे. ईशान्य भारतातील राज्यांकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. आसाममधील सरकार समृद्धी आणणारे सरकार असेल. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. आता तर आसाममधील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकतात, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

दरम्यान, केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम कायम झटत असतो, काम करत असतो. कधीही गरिबांसाठी काँग्रेसने काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष असल्याची टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी केले. अनेक बडे काँग्रेस नेते आसाममध्ये होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. पण, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. आसाममध्ये एम्स केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात उभे राहिल्याचे इराणी यांनी नमूद केले.