सचिन वाझेप्रकरणी शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका


नवी दिल्लीः दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांना यावेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आले. त्ंयांना शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष मिळून काम करत आहेत. कुठल्याही प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर परिणाम होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. काही समस्या सरकारसमोर येत असतात. त्यावर आम्ही मिळून तोडगा काढतो, असे पवार म्हणाले.

राज्याच्या गृह खात्याने मनसुख हिरण मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणी योग्य कारवाई केली आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना समोर आणले आहे. यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनामाच्या प्रश्न येत नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आपण त्यांच्याशी काय बोललो. पण सर्व काही माध्यमांसमोर सांगण्यासारखे नाही. सरकारसमोर काही समस्या येत असतात. पण मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा करून त्या सोडवल्या जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकार मिळून काम करत आहे. त्यात कुठलेही मतभेद नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्याबाबतही शरद पवारांना यांना प्रश्न विचारला गेला. पण या संदर्भात मुख्यमंत्रीच उत्तर देऊ शकतील, असे ते म्हणाले.

भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभी करण्याची गरज आहे. पण त्यावर अद्याप ठोस कुठीलीही चर्चा झालेली नाही. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी तिसरी आघाडी उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पण अद्याप याला कुठलेही स्वरुप आलेले नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेसचा राजीनामा देत वरिष्ठ नेते पी. सी. चाको यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.