नितेश राणेंनी केली वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाईंच्या चौकशी मागणी


मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझें यांचीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांचीही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज केली. सचिन वाझेंची मुख्यमंत्री ठाकरे हे एवढी वकिली का करत आहेत? असा सवालही नितेश राणे यांनी केला. नितेश राणे भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले की, अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील सापडलेल्या वाहनाचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. एकट्या वाझेंचा यात सहभाग असेल असे वाटत नाही. यामागे बड्या व्यक्ती आणि शक्ती असाव्यात. याचा सूत्रधार कोण आहे हे राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोधून काढणे आवश्यक आहे. वाझे यांनी आयपीएल स्पर्धेवर बेटिंग लावणाऱ्या टोळीशी संपर्क साधला होता, यासंदर्भात वरुण सरदेसाई यांनी वाझे यांच्याशी संपर्क साधला. वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात दूरध्वनीवर झालेल्या संवादाची व्हाट्सअॅप सारख्या माध्यमातून चौकशी केल्यास अनेक रहस्ये बाहेर येतील.

कोणत्याच घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना ठाकरे सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. ते शासकीय बैठकांनाही उपस्थित असतात. अनेक अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात, अशा सरदेसाईंनी वाझे यांच्याशी कोणत्या कारणासाठी कितीवेळा संपर्क साधला याचीही चौकशी ‘एनआयए’ने करावी, असेही नितेश राणे म्हणाले.

जूनमध्ये कोरोना काळात न्यायालयाच्या निर्णयानंतर निलंबित झालेल्या वाझेंना कमी मनुष्यबळाचे कारण देत पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना सेवेत पुन्हा घेण्याची शिफारस करणाऱ्या समितीत कोण-कोण होते याची माहिती जाहीर होणे आवश्यक असल्याचे देखील आमदार राणे यांनी नमूद केले.