महाराष्ट्रातील लोक सीमाप्रश्नी अनावश्यक हस्तक्षेप का करत आहेत? – कुमारस्वामी


बेळगाव – पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण, बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते.

शिवसेनेकडून देखील याला प्रत्युत्तर देण्यात आले, शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना कोल्हापुरात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील लोक सीमाप्रश्नी (बेळगाव) अनावश्यक हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. यामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे राज्य सरकार पंतप्रधानांचे नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नसल्याचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.