महिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच !

haunted-house1

अमेरिकेमधील ग्रीन्स् बोरो येथील नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या मॅडी नामक युवतीने तिला राहण्यासाठी म्हणून एक लहानसे अपार्टमेंट भाडेकरारावर घेतले. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत सुरु होते. काही दिवसांनंतर मात्र काही तरी घोटाळा असल्याचे मॅडीला जाणवू लागले. मॅडी राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये चित्रविचित्र घटना घडू लागल्या. ही सर्व हकीकीत मॅडीने आपले खरे नाव उघड न केले जाण्याच्या अटीवर एका वृत्तवाहिनीला कथन केली असून, सुरुवातीला मॅडीला तिचे काही कपडे अचानक गायब झाल्याचे लक्षात आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी मॅडीला अपार्टमेंटमधील बाथरूममधील आरशावर व काचेच्या शॉवर पॅनलवर हातांच्या बोटांचे ठसे आढळून आले. हे ठसे तिच्या बोटांचे नसल्याची मॅडीला पक्की खात्री होती. आपल्या अपार्टमेंटमध्ये कोणती नकारात्मक शक्ती तर नाही अशी शंका मॅडीला येऊ लागली, कारण मॅडीच्या अपार्टमेंटची किल्ली केवळ मॅडीकडे असून, इतर कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याच्या कोणत्याही खुणा तिला सापडल्या नव्हत्या.

haunted-house
काही दिवसांपूर्वी मात्र मॅडीच्या घरामध्ये असलेली ‘नकारात्मक शक्ती’ अचानक तिच्या समोर अवतरली. झाले असे, की संध्याकाळच्या वेळी मॅडी घरामध्येच असताना तिला तिच्या कपड्यांच्या कपाटातून खुडबुड ऐकू येऊ लागली. हा आवाज कसला हे पाहण्यासाठी मॅडीने दरवाजा उघडला तर त्यातून चक्क एक तरुण बाहेर आला. या तरुणाने आपले नाव अँड्र्यू स्वोफोर्ड असल्याचे सांगून आपणच या घरामध्ये वारंवार येऊन कपडे, इतर लहान सहान वस्तू चोरून नेत असल्याचे त्याने मॅडीला सांगितले आणि पोलिसांना न बोलवण्याबद्दल मॅडीला कळकळीची विनंती केली. त्याची दया येऊन मॅडीने पोलिसांना सूचना दिली नसली, तरी अँड्र्यूच्या नकळत तिने आपल्या मित्राला मात्र त्वरित इमर्जन्सी कॉल द्वारे मदतीस येण्याबद्दल सूचित केले.

मॅडीचा मित्र येईपर्यंत अँड्र्यूला व्यस्त ठेवणे आवश्यक असल्याने मॅडी त्याच्याशी काही ना काही बोलत राहिली. दरम्यान अँड्र्यूने मॅडीला कोणत्याही प्रकारे अपाय करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मॅडीने नंतर पोलिसांना सांगितले. मॅडीचा मित्र अपार्टमेंटमध्ये पोहचताच अँड्र्यू दोघांचे आभार मानून निघून गेला. त्यानंतर मॅडीने त्वरेने पोलिसांना बोलाविले आणि घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी लवकरच अँड्र्यूला अटकही केली. अँड्र्यू विरुद्ध याही पूर्वी लोकांच्या घरामध्ये घुसण्याच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या असल्याने त्याची रवानगी पोलिसांनी थेट तुरुंगात केली. आपल्या नकळत आपल्या घरामध्ये कोणीतरी सतत येत होते, येथे वावरत होते या विचाराने अस्वस्थ झालेल्या मॅडीने मात्र आता हे घर बदलण्याचा निर्णय घेतला असून, नव्या घरासाठी भाडेकरारही केला आहे.

Leave a Comment