तुम्ही चाखून पाहिल्यात का गोव्याच्या या खासियती?

goa
गोव्याची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता येईल. यामध्ये कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्यातून गोव्याला प्रचंड सागरी किनाऱ्यांचे वरदान असल्याने सागरी खाद्यही या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याच खाद्यसंस्कृतीच्या आगळ्या वेगळ्या खासियतींची ओळख करू घेऊ या. अतिशय मेहनतीने आणि कौशल्याने तयार केले जाणारे ‘बिबिंका’, हे गोव्याचे खास, केकप्रमाणे दिसणारे मिष्टान्न आहे. हे मिष्टान्न मूळचे पोर्तुगीजांकडून आलेले. हा पदार्थ बनविताना एकावर एक असे पीठाचे थर घालून, ते शिजवून हा पदार्थ तयार केला जातो. बिबिंकामध्ये सर्वसाधारणपणे पाच ते पंधरा, किंवा त्याहूनही अधिक थर असतात. गोव्याच्या बहुतेक बेकरींमध्ये हा पदार्थ तुम्हाला चाखावयास मिळेल. बिबिंकाच्या मोठ्याश्या स्लाईसवर बदामाचे तुकडे आणि त्याची जोडीने थंडगार आईस्क्रीम असले, की या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते.
goa1
‘कुल्कुल्स’ हे कुरकुरीत आणि साखरेमध्ये घोळविलेले लहान लहान वडे. हे तयार करणे मोठे जिकीरीचे काम असून, गोव्यातील बहुतेक घरांमध्ये हा पदार्थ परिवारातील बहुतेक सदस्यांच्या मदतीने बनविला जाणारा आहे. मधल्या भुकेच्या वेळी आवडीने खाल्ला जाणारा असा हा काहीसा खारट, काहीसा गोड, अश्या मिश्र चवीचा पदार्थ आहे. ‘पेराड’ नावाचा खास गोअन पदार्थ पिकलेले पेरू वापरून बनविण्यात येतो. पेरूचा गर वापरून जे चीझ बनविण्यात येते त्याला पेराड म्हटले जाते. अतिशय चविष्ट असे ही चीझ लालसर रंगाचे दिसते. या चीझचा वापर अनेक मिठायांमध्ये केला जातो, तर कधी हे चीझ, टोस्टच्या जोडीनेही खाल्ले जाते.
goa2
नारळाचा वापर करून बनविलेले, बाहेरून कुरकुरीत तर आतून अतिशय मऊ असणारे चविष्ट बिस्कीट ‘बोल्हीना’ या नावाने ओळखले जाते. बहुतेकवेळी दुपारच्या चहाच्या जोडीने बोलीन्हा आपल्या भेटीला येतात. नाताळच्या सणानिमित्त ही बिस्किटे खास बनविली जात असतात. हॉट चॉकोलेट च्या जोडीने ही बिस्किटे खाल्ली जातात. तसेच या बिस्किटांवर जॅम लावूनही खाण्याची पद्धत आहे. नारळ, गूळ आणि तांदुळाच्या पिठाचा वापर करून बनविण्यात येणारी आणखी एक मिठाई म्हणजे ‘दोदोल’. ही मिठाई दक्षिण-पूर्वेकडील देशांमध्येही लोकप्रिय आहे. पण गोव्यामध्ये बनविल्या जाणाऱ्या या मिठाईची खासियत अशी, की यासाठी येथे खास बनविण्यात येणाऱ्या गुळाचा वापर करण्यात येतो.
goa3
‘चोरिझो’ ही अतिशय चविष्ट मसालेदार सॉसेजेस गोव्याची खासियत आहेत. हा पदार्थ मूळचा स्पेन मधला. पण गोव्यामध्ये बनविल्या जाणाऱ्या ‘चोरिझो’मध्ये अनेक मसाले, लसूण आणि व्हिनेगरचा सढळ हस्ते वापर केला जातो. हे सॉसेजेस आकाराने लहान असून, या सॉसेजेसची ‘स्ट्रिंग’, म्हणजेच माळ बनविली जाते. एका स्ट्रिंगमध्ये पन्नास ते शंभर सॉसेजेस बांधले जातात, आणि आवश्यकतेनुसार ही सॉसेजेस या माळेतून कापून घेऊन भाजले जातात. गोव्याच्या या सर्व खासियती, गोव्यामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध असून, कधी गोव्याला जाणे झालेच तर आठवणीने बरोबर आणता येण्यासारख्या आहेत.

Leave a Comment