माजी विद्यार्थ्यांची मुंबई आयआयटीला विक्रमी 26 कोटींची देणगी


मुंबई – अमेरिकेतील आपल्या माजी विद्यार्थ्यांकडून पवई येथील मुंबई आयआयटीला विक्रमी 26 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. अमेरिकेत ‘आयआयटी बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केली असून तिच्या माध्यमातून देणगी जमा केली जाते.

या फाऊंडेशनने 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 3.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 26 कोटी 19 लाख रुपये देणगी जमा केली. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा 73 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 15.42 कोटी रुपये देणगी जमा झाली होती.

संस्थेसाठी 5 कोटी रुपये देणगी संस्थेतील ‘हॉस्टेल 5’मध्ये वास्तव्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांनीही जमा केली आहे. नुकताच मुंबई आयआयटीचा 62 वा स्थापना दिन सोहळा पार पडला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. संस्थेला गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांचा तुटवडा भासत असल्यामुळे माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही देणगी दिलासा देणारी आहे.