अशी कामगिरी करणारी मिताली राज ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू


लखनौ – आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज ही भारताची पहिली महिली क्रिकेटपटू ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात मितालीने ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यशासाठी बीसीसीआयने मितालीचे अभिनंदन केले आहे.

मिताली राज हिने १० कसोटी, २११ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांसह मितालीने ८ शतके आणि ७५ अर्धशतके झळकावली आहेत. विशेष बाब म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची सरासरी ही ५० हून अधिकची आहे.