कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, शनिवार बंद रहाणार शनिशिंगणापूर मंदिर


अहमदनगर: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.

शनी अमावस्याला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी शिंगणापूर येथे येतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनी मंदिर शुक्रवारी दुपारी तीन वाजता दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन बंद राहिल. रविवारी (१४ मार्च) दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल.

शनिवारी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी जमावबंदी लागू केली आहे. तसेच सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी ग्रामस्थांना व भाविकांना आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.