टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये नापास


अहमदाबाद: १२ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत ३-१ विजय मिळवलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण टीम इंडियाला टी-२० मालिकेआधी एक मोठा झटका बसला आहे.

टीम इंडियात निवड करण्यात आलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो बाहेर झाला आहे. त्याचबरोबर जलदगती गोलंदाज टी नटराजनदेखील दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता नाही.

बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला. सलग दुसऱ्यांदा वरुण फिटनेस टेस्ट पास करण्यात अपयशी ठरला आहे. तर यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या नटराजनच्या खांद्याला दुखापत झाली असल्यामुळे तो सध्या तरी संघासोबत असणार नाही.

गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये वरुणने शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची संघात पुन्हा निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला होता. आता पुन्हा तो अपयशी ठरला. वरुण दोन वेळा यो-यो टेस्टमध्ये नापास झाला. यात त्याला दोन किलोमीटर धावायचे होते.

आयपीएल २०२० मध्ये टी नटराजनने देखील चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली. अन्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता इंग्लंडविरुद्ध त्याला संधी देण्यात आली होती.