रवी पुजारीने न्यायालयाला सांगितले, मला तपास अधिकाऱ्यांना द्यायची आहे महत्त्वाची माहिती


मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून दोन वर्षांपूर्वी प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीच्या पोलीस कोठडीत मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने 15 मार्चपर्यत दिवसांची वाढ केली. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना आपल्याला काही गोष्टींची माहिती द्यायची असल्याचे रवी पुजारीने न्यायालयात सांगतिले.

विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे 2016 मध्ये खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. खंडणीविरोधी पथकाने याप्रकरणी 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रकऱणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता.

रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर 14 दिवसांची पोलीस कोठडी विशेष मोक्का न्यायालयाने सुनावली होती. हा कालावधी संपत असल्यामुळे मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश डी. ई कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

पुजारीकडून अद्याप चौकशी सुरू आहे. तसेच त्याचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याने कोठडीचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. पण, पुजारीच्या वकिलांकडून त्याला विरोध करण्यात आला. चौकशी तसेच जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला असून अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला. पण स्वत: पुजारीने न्यायालयाला सांगितले की, त्याला मुंबई पोलिसांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्याची दखल घेत न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पुजारीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.