कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत असून आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आनंदवन येथे 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज 250 लोकांच्या चाचण्या केल्या जात आहे. गेल्या एका आठवड्यात अचानक कोरोनाचा हा उद्रेक झाला आहे. यामुळे आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

या ठिकाणीच एक कोविड केअर सेंटर प्रशासनाने तयार केले असून सध्या याठिकाणी 83 लोकांवर उपचार सुरू आहेत. आनंदवनमध्ये झालेल्या कोरोनाच्या या उद्रेकाबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. कारण आनंदवनमध्ये गेल्या एक वर्षापासून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे उपचारासाठी बाहेर गेलेल्या एखाद्या आनंदवनमधील व्यक्तीमुळे हा संसर्ग घेऊन आत आल्याची आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था सामुदायिक असल्यामुळे तो तातडीने पसरल्याची शक्यता आहे.