उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा


डेहरादून – भाजपमध्ये उत्तराखंड विधनासभा निवडणुकीअगोदर मोठी राजकीय उलाथापालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबत पार पडलेल्या दोन बैठकींनंतर आज(मंगळवार) अखेर आपला राजीनामा दिला. रावत यांनी उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांना सादर केला.

सोमवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री रावत यांनी भेट घेतली होती. त्यांनी या भेटीअगोदर राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्याची जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले होते.

दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठक ही पार पडली. भाजपा उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम हे कोणताही नियोजीत कार्यक्रम नसताना जेव्हा देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. यानंतर या दोघांनी देखील आपला अहवाल भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.